Neeraj Chopra’s biggest honor
भालाफेक मध्ये देशाला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचा मोठा सन्मान करण्यात आला आहे. यापुढे प्रत्येक वर्षी ७ ऑगस्ट हा राष्ट्रीय भालाफेक दिवस साजरा केला जाईल.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला अॅथलेटिक्समध्ये सर्वात पहिले सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्या कामगिरीवर खुष होऊन एक मोठा निर्णय घेण्यात आलाय.
ऑलिम्पिकच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ७ ऑगस्ट रोजी नीरजने देशाला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. आता भारतीय अॅथलेटिक्स महासंघा(AFI)च्या योजना समितीने यापुढे प्रत्येक वर्षी ७ ऑगस्ट हा भालाफेक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
महासंघाच्या योजना आयोगाचे अध्यक्ष ललित भनोट यांनी ही माहिती दिली.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फिल्ड अॅथलेटिक्समध्ये भाग घेणाऱ्या खेळडूंच्या सम्मान कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना नीरज म्हणाला, भारतीय लष्कर आणि अॅथलेटिक्स फेडरेशनने त्याला खुप मोठी साथ दिली.
करोना काळात वैद्यकीय टीमने फार मेहनत घेतली. डायटपासून ते अन्य गोष्टींवर त्यांनी लक्ष ठेवले. यामुळेच माझी कामगिरी चांगली झाली.
पदक मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून चर्चा केली. या गोष्टीमुळे छान वाटले की देशाच्या पंतप्रधानांनी खेळाडूंशी चर्चा केली.
ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडू फक्त सहभागी होण्यासाठी आला नव्हता. तर त्याला पदक जिंकायचे होते. मला वाटते की येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी आणखी चांगली होईल, असे नीरज म्हणाला.
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तीक प्रकारात भारताला मिळालेले हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी २००८च्या ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकले होते.
नीरजच्या या कामगिरीमुळे १३ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत ऐकण्यास मिळाले.
Neeraj Chopra’s biggest honor