महिला क्रिकेट संघाचे हे आहेत नवे बॅटिंग कोच
बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल केला आहे. यावेळी भारताचे माजी खेळाडू ऋषिकेश कानिटकर यांना महिला वरिष्ठ संघाचा बॅटिंग कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ते आपल्या पदाचा कार्यभार ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेपासून स्विकारणार आहे.
ही मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होईल. तर महिला क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नवी भुमिका बजावताना दिसणार आहे.
🚨 NEWS 🚨: Hrishikesh Kanitkar appointed as Batting Coach – Team India (Senior Women), Ramesh Powar to join NCA
— BCCI (@BCCI) December 6, 2022
More Details 🔽https://t.co/u3Agagamdd
या नव्या नियुक्तीनंतर ऋषिकेष कानिटकरने प्रतिक्रिया दिली की,
‘वरिष्ठ महिला संघाचा बॅटिंग कोच होणे ही सन्मानाची बाब आहे. मला या संघात खूप क्षमता दिसत आहे. आपल्याकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. माझ्या मते हा संघ येणाऱ्या आव्हानांसाठी सज्ज आहे. येत्या काही काळात काही चांगल्या स्पर्धा होणार आहे. संघासाठी आणि बॅटिंग कोच म्हणून माझ्यासाठी हा काळ रोमांचकारी असणार आहे.’
याचबरोबर रमेश पोवार यांनी देखील एनसीएमधील आपल्या नव्या भुमिकेविषयी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,
‘वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माझा कार्यकाळ अनुभवाने समृद्ध राहिला. गेल्या काही वर्षात मी काही दिग्गज आणि देशातील उगवत्या ताऱ्यांसोबत मिळून काम केले. मी आता एनसीएमधील आपल्या नव्या भुमिकसह नव्या गुणवान खेळाडूंना तयार करण्यात मदत करणार आहे.’